औरंगाबाद: विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक १९ ऑगस्टला होत आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार सुभाष झांबड इच्छुक आहेत. परवाच एका कार्यक्रमात झांबड यांनी हिशेब चुकते करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा सक्रिय झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुलाला उमेदवारी देऊन काँग्रेसला आडवे येण्याची चाल सत्तार यांनी खेळण्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी काँग्रेसला खो देत भाजपशी संधान बांधले. मंत्रिपदाची लालूच दाखवून भाजपने सत्तार यांचा पुरेपूर वापर करून घेतला होता. मात्र सत्तार यांना मंत्रिपद काही मिळाले नाही. सिल्लोड तालुक्यातील भाजपाच्या निष्ठावंतांनी त्यांचा भाजप प्रवेशही रोखला. आता सत्तार काय भूमिका घेतात याकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष मुलाला उतरविण्याचा इरादा सत्तार यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेसची मात्र अडचण होणार असल्याचे दिसते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आमदार झांबड यांना प्रखर विरोध करीत सत्तार यांनी भाजपशी संधान साधले होते. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसकडून झांबड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आमदार झांबड यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या मार्गात अडथळा आणण्याचे काम सत्तार नक्कीच करतील असे बोलले जाते.
मुख्यमंत्र्यांशी हितगुज
दरम्यान भाजपची महाजनादेश यात्रा २० ऑगस्ट रोजी सिल्लोडला पोहोचणार आहे. या यात्रेत सत्तार काय भूमिका वठवतात याकडे आता राजकीय पंडितांचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्तार यांचा भाजप प्रवेश ही होऊ शकतो, असे समजते.